आनंद (1971)- 
Director - Hrishikesh Mukharji
Dialogues - Gulzar...




संवादातून तत्वज्ञान.....



“बाबूमोशाय जिन्दगी और मौत तो उपरवाले के हाथ में हैं| उसे न तो आप बदल सकते हैं न में| हम सब तो रंगमंचकी कठपुतलियाँ हैं, जिसकी डौर उपरवाले की उँगलियों में बंधी हें|”

आनंद सिनेमातील हा डायलॉग सिनेसृष्टीतील अनेक डायलॉग पैकी एक आहे. हा डायलॉग इतका प्रभावी आहे की जणू अख्खा आनंद सिनेमाच या डायलॉग भोवती फिरतो. 

तसे पाहीले तर “आनंद” हा सिनेमा आताच्या व्यावसायिक सिनेमाच्या पठडीत मुळीच बसणार नाही. कारण सध्याच्या काळात चित्रपट हिट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या समि‍करणात कदाचित नीट बसणार नाही. तरीही मनावर प्रभाव टाकण्याच्या बाबतीत हा सिनेमा कुठेही तसू भर सुद्धा कमी पडत नाही.

आनंद हा सिनेमा सर्वात प्रथम मी दूरदर्शन वर पहिला.  “आनंद” हा सिनेमा आज इतक्या वर्षा नंतरही केवळ स्मरणात राहतो इतकेच नाही तर आयुष्यातील काही निर्णयांवर प्रभावही टाकतो.

अगदी साध्या पद्धतीने सुरु होणारा हा सिनेमा अत्यंत साध्या पद्धतीनेच पुढे सरकतो. दिल्लीवरून मुंबईच्या एका डॉक्टरकडे उपचारासाठी येणार्‍या एका व्यक्तीची ही कहाणी आहे. ही व्यक्ती मुंबईत उपचारासाठी जरी येत असली तरी ती केवळ एक औपचारिकताच आहे. त्याच्या दोन्ही डॉक्टरांना माहित आहे की या आजारावर करण्यासारखे त्यांच्या कडे उपचारच नाहीत. पेशंटने उरलेला वेळ आनंदात घालवावा म्हणून केलेली ही एक सोय आहे. सिनेमा हा या व्यक्तीच्या मुंबईतील आगमनापासून सुरु होतो, आणि रोजनिशीच्या प्रसंगातूनच पुढे जातो.

यातील वेगळेपण जे मनाला ठसते ते म्हणजे या सर्वच प्रसंगातूनच काही ना काही तत्त्वज्ञान पुढे येत राहते. हा चित्रपट तुम्हाला खुर्चीवर कदाचित खिळवून ठेवणार नाही, पुढे काय होणार असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण होणार नाही, तरीही समोर जे चालले आहे ते इतके प्रभावीपणे पुढे सरकते की माणूस विचारात अडकल्या शिवाय राहात नाही.

“जिंदगी बड़ी होनी चाहिए, लम्बी नहीं|”,

“जब तक जिन्दा हूँ मरा नहीं| जब मर गया साला मैं ही नहीं|” असे विविध डायलॉग नक्कीच विचार करायला भाग पाडतात.

मुंबईत येणार्‍या व्यक्तीचे नाव, जे या चित्रपटाचेही नाव आहे “आनंद” हे सुद्धा अत्यंत सूचकपणे वापरले आहे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा आनंद येत असतो. तो जेव्हा येतो तेव्हाच खरे तर प्रत्येकाला माहित असते की हा चिरकाल टिकणार नाही, फार तर आपल्या बरोबर काही क्षणांचाच सोबती आहे. ही सर्व परिस्थिती माहित असून सुद्धा त्याचे (आनंदाचे) स्वागत करणे, त्याच्याबरोबर वेळ घालवणे आणि आठवणी तयार करणे हे कोणीच टाळू शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचे कर्तव्य निभावत असतो. परंतु हे सगळे करत असताना नकळतच आपण त्याच्या (आनंदाच्या) संमोहनात अडकत असतो. तो आपल्याला सोडून जाणार हे वास्तव आपल्या मनाच्या एका कोपर्‍यात असले तरीही ते आपण जाणते-अजाणतेपणाने दुर्लक्षित करतो. त्याचा सहवास आपल्याला हवा हवासा वाटू लागतो, किंबहुना त्याने आपल्याला कधीच सोडून जाऊ नये ही भावना आपल्या मनात दृढ होत असते तो मात्र वेळोवेळी निर्विकार पणे आपल्याला एकच सत्य सांगत असतो –

“बाबूमोशाय जिन्दगी और मौत तो उपरवाले के हाथ में हैं| उसे न तो आप बदल सकते हैं न मैं| हम सब तो रंगमंचकी कठपुतलियाँ हैं जिसकी डौर उपरवाले की उँगलियों में बंधी है|

कब? कौन? कैसे उठेगा? ये कोई नहीं बदल सकता............”

Marathi Film-Review by Swapnil Tikhe : 111031862

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now