आमचे बदनापूरचे घर
नोकरीच्या निमित्ताने बदनापूर सोडून मला 50 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला,तरीही आजसुद्धा स्वप्नात जे घर येते ते बदनापूरचेच असते.
7फूट बाय 60 फूट अशा आगगाडीच्या आकाराचे घर थेट समोरच्या गल्लीपासून मागच्या गल्लीपर्यंत होते.
माझे आणि चंद्रकांतचे बालपण त्याच घरात गेले. त्या घराच्या अनेक आठवणी म्हणजे आमच्या मर्मबंधातली ठेवच आहे.
बदनापूरच्या सरकारी शाळेत शिपाई असलेली आई न चुकता रोज सकाळी चार वाजता उठायची. सकाळी सातलाच शाळा उघडत असे. त्यामुळे तिला घरचे सगळे आवरून सातच्या आत शाळेत पोचणे भाग असे.
आमच्या गल्लीत कुणालाही गावाला जाण्यासाठी किंवा इतर कारणाने लवकर उठायचे असेल तर ती व्यक्ती आदल्या सायंकाळीच आईला सांगून ठेवीत असे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटेच आई त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला उठवीत असे.
आमच्या घराच्या दोन्ही बाजूंचे शेजारी यांच्याशी आमचे अगदी सलोख्याचे संबंध होते.
आम्हा दोघा भावांचे शिक्षण, विवाह, नोकऱ्या या सर्व बाबतींमध्ये त्या घरातील आठवणी आजही ताज्या आहेत.
नोकरी सांभाळून आई प्रत्येक सणवार अगदी व्यवस्थित साजरा करीत असे. विशेषत: महालक्ष्मीच्या सणाच्या वेळी आईचा उत्साह पाहण्यासारखा असायचा. वय झाले तरी आई महालक्ष्मीचा सण साजरा करण्यात जराही कमतरता पडू देत नसे.

Marathi Story by Uddhav Bhaiwal : 111829775

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now