तुळशीचं लग्न?!!
एका रोपाचं आणि देवाचं लग्न? लहानपणी न उमजलेली गोष्ट. माझ्या दाक्षिणात्य मैत्रिणींच्या घरात खास करून तुळशीच्या लग्नाला बोलवत असत. छान परकर पोलकं वगैरे घालून, नटून आम्ही जात असू. नंतर मिळणारं छान जेवण आणि गोडधोड हे त्यामागचं खरं आकर्षण असे.
महाविद्यालयात असताना कृष्ण मंदिरांमधे तुळशीविवाह पाहण्याचा योग आला. त्रिपुरी पौर्णिमेला पाताळेश्वराला किंवा ओंकारेश्वराला जायची दांडगी हौस. मला त्यावेळी ते उजळणारे त्रिपुर, सभोवताली पणत्यांचा झगमगाट याचंच जास्त कुतूहल वाटे. लक्ष लक्ष तेजात उजळलेले भाविकांचे चेहरे निरखायला मला आवडे. त्यावेळी धरामशास्र नावाचं गारूड मनावर अजून चढलेलं नव्हतं त्यामुळे मी उत्सवी आनंदातच रमलेली असे. नंतर मात्र हळूहळू वाचन वाढलं... मग आख्यायिका, तुलसी महात्म्य, शालिग्रामाचं महत्व, वैष्णव सप्रदाय असं काही वाचून मग माझी समज थोडी वाढत गेली. त्रिपुरी पौर्णिमेला पर्वतीवर आम्ही शाहू काॅलेजच्या मैदानातून मागून जात असू. पुढच्या पायर्‍यांवरची गर्दी त्यामुळे कधीच आड आली नाही. तिथल्या विष्णु मंदिरातही सोहळा सुरू असे आणि कार्तिकस्वामीही दर्शनासाठी रात्रभर जागते असत.नटूनथटून आलेल्या महिलांची लगबग पर्वती जागती ठेवत असे. लांबून कुठून फटाके उडताना दिसत... अवर्णनीय नेत्रसुखद अशी ती रात्र असे.
एकेवर्षी दिवाळीनंतर आम्ही सहकुटुंब कोस्टल कर्नाटक फिरायला गेलो. अन अचानक कार्तिकातल्या त्या रात्री फुलून आल्या. दूरची ठिकाणे पाहून अगदी जंगलातल्या रस्त्याने बस येतानाही वाटेवरल्या छोट्या वाड्यांमधे दारातल्या वृंदावनात नववधू सजलेली असे. लग्न झालेलं असे किंवा काही ठिकाणी पूजा सुरू असे. केळीच्या खांबांना मधे छिद्र पाडून त्याच्या इडव्या पट्ट्यांवर पणत्या लावून दारोदारी लग्नघराची सजावट दिसे. पारंपरिक पोशाखातल्या कुटुंबांना पाहून मजा येई.
एकदा आम्ही त्रिपुरीच्या इदल्या रात्री जुन्नरास पावतें झालो. दुसर्‍या दिवशी पहाटे चावंड चढाई होती. एक बस मुंबईहून निघाली आणि आम्ही पुणेकर मित्रमंडळी जुन्नरला राहिलो. जून्नरला रात्री जेवणानंतर एका डेअरीमधे मलई भरपूर घातलेले गरम दूध पिताना समोर एक मोठ्ठा फलक दिसला. तुलसी दामोदर विवाहाचा. आपण लग्नपत्रिका छापतो नं अगदी तस्संच सगळं लिहिलेलं! मला ते पाहून अगदीच जाणवलं की जसा मी तसा माझा देव!
एकवर्ष तुळशीचं लग्न नंतर मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी लावल तिन्हीसांजेला आणि रात्री नऊला लगेच लोणावळा लोकलने आम्ही सातआठ मैत्रिणी निघालो एका समूहासोबत... राजमाचीच्या पायी यात्रेला...त्रिपुरीचा तो चंद्र आणि आमची उत्तररात्रीची ती पायपीट... लोणावळा स्टेशनहून पुढे चालताना वाटेत एका मंदिरात तुळशीचं लग्न सुरू होतं. मंगलाष्टका ऐकू आल्या आणि नंतर अभंगांचे सूर खूप दूरपर्यंत रेंगाळत येत राहिले.
आजही तुळशीचं लग्न जवळ आलं की या आठवणी मन तृप्त करून जातात!

Marathi Blog by Aaryaa Joshi : 111614892

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now