चला कवितेच्या जगात .........

कविता म्हणजे गीत-गाणे-काव्य. अगदी लहानपणापासून प्रत्येकांना कवितेची गोडी असते. लहान बाळाला जेवू घालतांना किंवा झोपू घालतांना आई नेहमी काहीतरी गुणगुणत असते. तिचे ते गुणगुणने म्हणजे एकप्रकारे कविताच असते. एक घास चिऊचा एक घास काऊचा म्हणत आई बाळाला जेवू घालते तर निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई हे गीत म्हणत बाळाला झोपू घालते. बाळाच्या कानावर लहानपणापासून असे काव्य आदळत असतात त्यामुळेच कविता आवडत असते. शाळेत जाण्यापूर्वी अंगणवाडी किंवा बालवाडीमध्ये गेल्यावर बाळाच्या कानावर येरे येरे पावसा, एवढा मोठा भोपळा, आपडी थापडी गुळाची पापडी असे बडबड गाणे ऐकायला मिळतात. कवितेला ताल मिळाले की ते गाणे बनते. लहान वयात अश्या तालमय कविता खूप आवडतात. शाळेत प्रवेश केल्यावर मग कवितेचा अभ्यास सुरू होतो. अनेक कविता येथे वाचायला मिळतात. वर्ग वाढत जातात तसे कवितेची गंभीरता वाढत राहते. पुढे कळते की, कविता दिसते सोपी पण त्याची निर्मिती करणे खूप कठीण बाब आहे. जीवनात आजपर्यंत ज्या कोणत्याही गोष्टी सहज आणि सोपी वाटतात प्रत्यक्षात ते करणे खूप कठीण गोष्ट असते. स्वयंपाक करणे हे सोपे आहे असे वाटते मात्र प्रत्यक्षात जेंव्हा किचनरुममध्ये प्रवेश करतो त्यावेळी कळते की किती कठीण आहे. असेच काही कवितेच्या बाबतीत आहे. कवितेत काय असते ? शब्दांचे यमक जुळवले की झाली कविता तयार. पण तसे मुळीच नाही. यमक तर जुळवावे लागते तरच त्याला ताल मिळते पण नुसते यमक जुळवून काही फायदा नाही तर त्यातून काही अर्थ बाहेर पडणे देखील गरजेचे आहे. कवी आपल्या मनातील भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. साहित्यात कवितेचे अनेक प्रकार आहेत. सोशल मिडीयावर एक नजर फिरवली असता असे दिसून येते की, सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक शीघ्रकवीचा जन्म झाला आहे. अनेक समुहातील संयोजक नवसाहित्यिकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी कविता तयार करण्याचे कार्यक्रम ठेवत आहेत, काही ठिकाणी ऑनलाईन कविता वाचन चालले आहे, कविसंमेलन देखील घेतल्या जात आहे. अनेक वृत्तपत्रात कवितेला स्थान दिल्या जात आहे. साहित्य निर्मितीसाठी या सर्व गोष्टी खूपच आवश्यक आणि चांगल्या आहेत, याबद्दल वाद नाही. मोबाईल आणि इंटरनेट या दोन गोष्टींमुळे खेड्यापाड्यातला कवी व त्याच्या कविता राज्यात, देशात काय जगात पोहोचत आहेत. ज्याच्याजवळ प्रतिभा आहे त्याची कविता कधी ना कधी नक्की प्रकाशज्योतात आल्याशिवाय राहणार नाही. पण काही मंडळी या सोशल मीडियात असे ही आहेत जे की, दुसऱ्याचे साहित्य आपल्या नावावर प्रसिद्ध करायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. साहित्याची चोरी करणाऱ्या अशा लोकांवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण बाब आहे. नकल करून कविता करताच येत नाही. त्यासाठी स्वतःमध्ये एक प्रतिभा असावी लागते. अभ्यास करण्याची सवय असावी लागते. भाषेतील व्याकरणाचे नियम माहीत असणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत त्या भाषेतील शब्दसंपत्ती देखील तितकीच महत्वाची आहे. एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द माहीत नसेल तर कविता करताना अनेक अडचणी येतात. म्हणून समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द, अलंकारिक शब्द, वावप्रचार, म्हणी या साऱ्या गोष्टींचा चांगला अभ्यास असेल तरच सुंदर कवितेची निर्मिती करू शकतो. कविता करतो म्हणजे करता येत नाही. तर कविता सहज सुचणारी प्रक्रिया आहे. त्याला अनुसरून आपला अभ्यास आणि अनुभव दांडगा असेल तर नक्कीच उत्तम दर्जाची कविता जन्मास येईल. कविता उत्तम आहे किंवा नाही हे स्वतः कवी कधीही ठरवू शकत नाही तर त्यासाठी एक वाचक वर्ग असायला हवे. जे की कवितेतील चूका आणि दुरुस्ती सांगू शकेल. जन्मतःच कोणी कवी किंवा कवयित्री राहत नाही. तर त्यासाठी कठोर मेहनत, परिश्रम आणि अभ्यास करण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे.
- नासा येवतीकर

Marathi Poem by Na Sa Yeotikar : 111521588

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now