हिंदूंचा पवित्र महिना श्रावण

हिंदू धर्मियांत सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण. आषाढ महिना संपला की श्रावण महिन्याला सुरुवात होते. पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली असते, निसर्ग कात टाकून सर्वत्र हिरवेगार दिसतो. सर्वत्र पाणीच पाणी दृष्टीस पडतो. असे म्हटले जाते की या महिन्यात पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याकारणाने आहाराच्या बाबतीत काळजी घेतली जाते. काही दिवस सूर्यदर्शन देखील होत नाही. म्हणून विशेष करून जड अन्न म्हणजे मांसाहार टाळले जाते. त्याचबरोबर उडदाची डाळ, कांदा व लसूण हे देखील वर्ज्य करतात. त्यामागे नक्कीच काही तरी शास्त्रीय कारण आहे. पूर्वी या महिन्यात एवढं पाऊस पडायचा की, लोकांना प्रातर्विधी करायला देखील बाहेर पडता येत नसे. याच महिन्यात जुलाब आणि हगवण सारख्या आजाराची साथ देखील वाढत असे. पण आजकाल पाऊस ही कमी झाला आणि लोकं स्वच्छतेच्या बाबतीत खूप जागरूक झाली त्यामुळे हा त्रास कमी झाला. शेतातली जवळपास सर्व कामे संपलेली असत त्यामुळे घरी बसले तरी मनाला काही रुखरुख वाटत नसे. श्रावण महिन्यातील 26 जुलै 2005 ही तारीख मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. सतत दोन दिवस पडलेल्या पावसाने पूर्ण मुंबई शहर जलमय झाले होते, अनेक ठिकाणी नदीला पूर आला होता, राज्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता, शाळेला दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली होती, इतका पाऊस त्यानंतर केरळमध्ये 2018 या वर्षी पहायला मिळाला. दर काही वर्षांनी पाऊस आपले रूप दाखवत असतो. जुन्या काळातील लोकं या महिन्यात पोथी व पुराण यांचे वाचन करून वेळ घालवीत असत कारण त्याकाळी टीव्ही व मोबाईल यासारखे मनोरंजनाचे कोणतेही तंत्रज्ञान नव्हते. गावात एक ठिकाण ठरवायचे त्याठिकाणी गावातील शिकलेली व्यक्ती नित्यनेमाने रात्रीच्या वेळी तेथे येऊन तास-दीड तास पारायण करायचे आणि आपापल्या घरी झोपायला जात असत. आज असे चित्र बघायला मिळत नाही, तसेच कोणी या काळात रामायण किंवा महाभारत वाचत नाहीत तर टीव्हीवर मालिका पाहतात किंवा मोबाईलवर गुंग होऊन गप्पा मारत बसतात. त्यामुळे त्यांचा वेळ कसा निघून जातो हेच त्यांना कळत नाही. काही भाविक महिला श्रावण सोमवारी भगवान शंकराची आराधना म्हणून उपवास करतात तर पुरुष मंडळी शनिवारी बलोपासक मारोतीरायाची उपासना करण्यासाठी उपवास करतात. तर काही भाविक असे ही आढळून येतात की जे फक्त दिवसातून एकदाच जेवण करण्याचे व्रत करतात. ज्याप्रकारे मुस्लिम बांधव त्यांच्या पवित्र रमजान महिन्यात दिवसातून एकदाच जेवण करतात, अगदी त्याप्रमाणे म्हटलं तरी चालेल. याच महिन्यापासून सणांची खरी सुरुवात होत असते. आखाडी पौर्णिमेला माहेरी आलेली मुलगी नागपंचमी व राखीपौर्णिमा करून सासरी जात असे. नवीन लग्न झालेल्या मुलीला आषाढी सणानिमित्त माहेरी आणल्या जाते. काही दिवसांनी पुढील सण येत असल्याने ये-जा करण्यास त्रास नको म्हणून एवढं दिवस राहत होते. पण आज एवढे दिवस कोणी माहेरी राहत नाहीत. कारण दळणवळणाची खूप मोठी सोय आज झालेली आहे. स्वतःची किंवा खाजगी गाडीने माणूस एका दिवसांत आपला प्रवास पूर्ण करत आहे. त्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि गोपाळकाला म्हणजे मुलांचा आवडता दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. असे करत करत महिन्याचा शेवटी अमावस्येला बैलांचा सण पोळा येतो. शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणजे बैल. बैलामुळे त्याचे अनेक अवजड कामे सोपी होतात. म्हणून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. यादिवशी सर्वांच्या घरात पुरणपोळीचे जेवण तयार केले जाते. अगोदर घरातील बैलांना खाऊ घालून मग सारेजण पुरणपोळीचा आस्वाद घेऊन हा सण साजरा करतात. या पद्धतीने श्रावण महिन्यातील विविध सणामुळे हा महिना प्रत्येकांसाठी अत्यंत महत्वाचा आणि पवित्र समजल्या जातो.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

Marathi Thought by Na Sa Yeotikar : 111517097

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now