माझा चष्मा

चष्मा म्हणजे ऐनक. लहानपणी या चष्म्याचे खूप अप्रूप वाटायचं. चष्मा लावलेला कोणी व्यक्ती दिसला की तो खूप महान व्यक्ती आहे असे समजायचं. पुस्तकात जे महान व्यक्ती बघितलं त्यांच्या डोळ्यावर चष्मा असायचा म्हणून तो समज झाला होता. घरात आजी- आजोबाचा चष्मा खाली दिसला की ते डोळ्यावर लावून पाहायचो. थोड्याच वेळात चक्कर आल्यासारखे व्हायचं आणि लगेच काढून टाकायचं. कॉलेजमध्ये जाणारा मोठा भाऊ त्याच्याकडे ही एक चष्मा असायचा त्याला तो गॉगल म्हणत असे. तो मात्र त्या गॉगलला कोणाला हात लावू देत नसे. कधी चुकूनमाकून मिळाला तर ते डोळ्यावर लावायचं आणि आरश्यात निरखून पाहायचं. गॉगलला हात लावला म्हणून तो ओरडायचा. गावाजवळ एखाद्या सणानिमित्त जत्रेचे आयोजन होत असे. त्या जत्रेतून खरेदी करायची एकच वस्तू असायची ते म्हणजे चष्मा. घरात दोन-चार चष्मे पडून असताना अजून हा नवीन चष्मा कशाला घेतलास म्हणून आई ओरडायची. तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. चष्मा लावून सायकल फिरवायची भारी हौस. शाळेत गुरुजी चष्मा लावण्यास मनाई करायचे. बहुतांशवेळा तर शाळेत गुरुजींला चष्मा दिसला की ते जप्त करीत असत. वर्गात एक मुलगा होता त्याच्या डोळ्यावर नेहमी चष्मा असे गुरुजी त्याचा चष्मा का जप्त करत नाहीत ? हे कळायला थोडा वेळ लागला. त्या मुलाने जर चष्मा लावला नाही तर त्याला अभ्यास करता येत नाही. न राहवून त्याला एकदा म्हणालो, " तुझी तर भारीच मजा आहे बाबा, तुला रोज चष्मा वापरायला मिळतो. यावर तो जराश्या नाराजीच्या सुरात म्हणाला, " कसली मजा रे भाऊ, चष्मा लावणे म्हणजे सजा आहे. चष्मा लावला नाही ना तर मी आंधळाच होतो." हे ऐकून मला त्याची कीव आली. वर्गातले काही मित्र त्याला चष्मेबद्दूर म्हणायचे, काहीजण चसमिस म्हणायचे तर काहीजण बॅटरी म्हणून चिडवायचे. असे शब्द ऐकून तो खूप नाराज व्हायचा, हे पाहून मी पण दुःखी व्हायचो. असे दिवस कोणाला येऊ नये अशी प्रार्थना करायचो. चष्मा म्हणजे परावलंबन हे त्या दिवशी कळले. शाळेतील बहुतेक शिक्षक आणि शिक्षिकांच्या डोळ्यावर चष्मा असतोच. एके दिवशी भारी गंमत झाली. आमचे मराठी शिकवणाऱ्या बाई आपला चष्मा शोधू लागली. चष्माशिवाय त्यांना वाचता येईना. आपली पर्स चेक केली, सर्वत्र शोध घेतली, मुलांना कळेना की बाई काय शोधत आहेत ? समोरच्या एका मुलाने धाडस करून विचारले, " बाई, तुम्ही काय शोधत आहात ?" यावर बाईने थोड्या रागातच म्हटले, " अरे माझा चष्मा शोधतोय, कुठं ठेवलं हेच कळेना." यावर सारा वर्ग हसू लागला. मुलांचे हसणे पाहून बाईनी टेबलावर जोरात छडी मारली आणि गप्प बसा म्हणाली. तेव्हा त्याच मुलाने बाईना सांगितलं, " बाई, तुमचा चष्मा तुमच्या डोक्यावर आहे." गंमत आहे की नाही. असे चष्म्यासोबत अनेकवेळा घडते. विसरभोळे माणसं चष्मा विसरून जाऊ नये म्हणून त्याला दोरी बांधून गळ्यात अडकवून ठेवतात. एका मित्राने विनोद म्हणून संशोधन करण्यासारखा प्रश्न विचारलं. देवाने आपणाला दोन कान दिले म्हणून बरे झाले नसता चष्मा कुठं अडकवता आला असता ? त्याचसोबत आज काही वृद्ध माणसे आढळून येतात ज्यांचे वय सत्तरीच्या पार झालेलं आहे मात्र चष्मा लागलेला नाही. टीव्ही जास्त वेळ पाहिलं नाही तर डोळे चांगले राहू शकतात. आजकाल लहान मुले मोबाईलवर विविध गेम आणि इतर काम करतांना आढळून येत आहेत. त्यामुळे डोळे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळे आहेत तर सर्व आहे. डोळ्याला चष्मा लागणे म्हणजे आपले जीवन परावलंबी झाल्यासारखे होय. म्हणून डोळ्यांची काळजी घ्या आणि चष्म्यापासून दूर राहा.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Marathi Thought by Na Sa Yeotikar : 111511678

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now