मनोजवं मारूततुल्य वेगं
जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये!!असं रामरक्षेत हनुमानाचं वर्णन केलं आहेच जे आपल्याला माहिती असतं.

जय हनुमान ज्ञान गुन सागर जय कपीस तिहुँ लोक उजागर! या शब्दात गोस्वामी तुलसीदास त्याचं गुणगान करतात.

श्रीरामांचा आदर्शभक्त म्हणून हनुमान सर्वपरिचित आहे.
शेपटीने लंका जाळणारा, सीतेला अशोकवनात जाऊन भेटणारा आणि जन्मतःच उगवत्या सूर्याला फळ समजून त्याला खाण्यासाठी सूर्याकडे झेपावणारा हनुमान आपल्याला बालपणापासूनच ओळखीचा असतो. लहान मुलांना आजही या वानरस्वरूपी देवाबद्दल कुतूहल वाटतेच.
वज्राने त्याची हनुवटी तुटली म्हणून हनुमान, कपि म्हणजे वानरांचा प्रमुख म्हणून कपीश, मरूत म्हणजे वार्‍याचा मुलगा म्हणून मारूती अशी अनेक विशेषणे या देवाला मिळालेली आहेत.
सात चिरजीवांपैकी तो एक मानला जातो.पण मूलतः मारूती अजूनही जिवंत आहे म्हणजे ते "तत्व" आजही जिवंत आहे असा अर्थ घेणं योग्य वाटतं! मारूतीचे गुण अंगिकारणं आजही तितकंच कठीण! पण प्रयत्नांनी साध्य होण्यासारखं!
एक तर बलाची देवता आहे तो! कोणत्याही परिस्थितीवर मात करायची असेल तर त्यासाठी कुशाग्र बुद्धी हवी आणि बलदंड शरीर हवं.मनही स्थिर हवं.असा शरीर मन बुद्धीवर ताबा असलेला मारूतीराया ! समर्थ रामदासांनी म्लेंच्छांविरूद्ध लढण्यासाठी महाराष्टातल्या युवकांना आदर्श दिला तो हनुमानाचाच!कोदंडधारी राम आणि गदाधारी मारूती ही दैवते समर्थांनी स्वराज्य स्थापनेसाठी दिली ती याचसाठी!
आपल्या स्वामीवर निष्ठा असणं याचा आदर्शही हनुमानच!
भगवान विष्णूंनी रावणाचा वध करण्यासाठी रामाचा अवतार घेतला आणि भगवान शिवांनी त्यांची सेवा करण्याची संधी घेतली मारूतीच्या रूपात जन्म घेऊन ही आख्यायिका आहे. पण त्यामधेही रामभक्ती ठायी ठायी दिसून येते.
कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे असं समर्थांनी सांगितलं त्याला एक आध्यात्मिक अर्थही आहे.
शरीर मन बुद्धीवर विजय मिळवून उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती साधून ईश्वरी तत्वात विलीन होण्याचा संदेश मारूती देतो आणि म्हणूनच त्याच्या हृदयात कायमच प्रभू रामचंद्र विराजमान आहेत ! मारूती त्याची छाती फाडून दाखवतो तर त्यात रामचंद्र दिसतात याचा रूपकात्मक अर्थ हाच आहे!
पूर्ण चंद्र आकाशात तेजाने निथळत असताना पहाटेच्या मंगल प्रसंगी जन्मलेला मारूतीराया औत्सुक्याने भरलेला आहे. लंकादहनाप्रसंगी त्याची निडर आणि संकटांशी सामना करण्याची वृत्ती दिसून येते. परंतु सीतेला अशोकवनात भेटून रामाची खूण असलेली अगठी दाखवताना भक्तीने ओतप्रोत भरलेला आणि काहीसा हळवा झालेला हा बलाढ्य वीरही आपल्याला भेटतो.
एकूण काय तर आनंदी चित्तवृत्ती,लढण्याची तयारी,बुद्धीचातुर्य,शारिरिक क्षमता,मनावर नियंत्रण आणि स्वामीविषयी अनन्य शरणता असा मारूती वीर आहे,धीर आहे,चपळ आहे तसाच सहृदयही आहे.
त्याचा असा एक गुण तरी आपल्यात यावा असा संकल्प करूया!

Marathi Religious by Aaryaa Joshi : 111449725

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now