*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*

*🌸 प्रवचने :: २४ मार्च 🌸*

*प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा.*

आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे, आणि ते मिळण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हांला लागणे जरूर आहे. ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू.

वास्तविक, आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते, तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरूरी नसते; त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे.

मनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले, खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल. असे असताना मनुष्यप्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये ?

मनुष्यप्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो; मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये ?
मला वाटते, ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ते ध्येय ठरविताना आम्ही चुकत असलो पाहिजे खास.

आमचे ध्येय असे असले पाहिजे की, त्यातून आम्हांला शाश्वत आनंद मिळविता आला पाहिजे. तो आनंद जर एवढया कष्टाने, मेहनतीनेसुद्धा आम्हांला मिळत नसेल, तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणायला कोणती अडचण आहे ?

तुम्ही सांगा. आज प्रपंच आम्हांला हवासा वाटतो, प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हांला सुख देतील असे वाटत असते, आणि त्या मिळविण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो.

वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून, त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी, आम्हांला ती वस्तू हवी असते. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे.

आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते; ती माझी कल्पना नाहीशी होणे जरूर आहे.

ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोवर भगवंताचे दास आम्हांला होता येणार नाही, आणि शाश्वत समाधान आम्हांला मिळणार नाही.
"तूं जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो, " असे भगवंत आम्हांस सांगत आहे.

ही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम, आम्हांला कसे सुटेल ? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हांला येणारच नाही का ?

प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल, ह्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे. त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे.
ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे.

भगवंताला अशी प्रार्थना करावी कीं, " देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. "

*८४ . दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे , तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे .*

*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

Marathi Whatsapp-Status by vinayak mandrawadker : 111372742

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now