आलय ना तुमच्या मनात, चलाSSSSS
टी व्ही वरील त्याच त्या रटाळ मालिका मी सहसा बघत नाही. तोच तो प्रेमाचा त्रिकोण, लग्नानंतर चालणारी चोरून लफडी, व्यसनाच्या आहारी गेलेली तरुण पिढी यातून काय बोध घ्यायचा हा मलाच नाही तर सर्वच विचारी माणसांना पडणारा प्रश्न आहे. काही वेळेस मात्र एखादी मालिका आपणास आशेचा किरण देऊन जाते. त्याचे कथानक मनाला भावणारे असते. त्यातील काही काही वाक्ये आपणास जीवनविषयक शिकवणूक देऊन जातात.
स्टार प्रवाहवर सध्या सुरू असलेली अग्निहोत्र ही अशीच एक बघत रहावी अशी मालिका. त्यातील एक वाक्य तर मला खूप आवडले. ते वाक्य “ आलंय ना तुमच्या मनात, चलाSSSSS “ असे होते. मालिकेत ते वाक्य वेगळ्या अर्थाने योजले आहे. सातत्याने ते वाक्य मी ऐकल्याने मला त्याचा सकारात्मक अर्थी बोध झाला. त्यावर मी विचार करू लागलो. खरच किती आशयपूर्ण हे वाक्य आहे याची मला नकळतपणे जाणीव झाली.
बघा ना जीवनात कितीतरी गोष्टी आपल्या मनात आलेल्या असतात मात्र त्याच्या पूर्णतेच्या दृष्टीने आपण कधीही विचार करीत नाही. एकाच ठिकाणी राहून आपल्याला कंटाळा आलेला असतो. जीवनात काहीतरी बदल हवा असतो. हवापालट म्हणून कोठेतरी जाण्याची इच्छा होते मात्र आपण नकाराचा व समस्येचा पाढा वाचत बसतो.” आलय ना तुमच्या मनात, चला” या भूमिकेतून आपण त्याकडे पहात नाही. तात्काळ निर्णय घेत नाही.
काही वेळेस घरात जेवण करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन सूप प्यावे, गुजराती थाळी खावी किंवा पंजाबी डिश घ्यावी असा विचार आपल्या मनात येतो. त्याचवेळी आपण खर्चाचा विचार करत असतो. मानवी जीवन एकदाच आहे असा विचार करून “आलंय ना तुमच्या मनात, चला” या सल्ल्यानुसार आपण तात्काळ निर्णय घेऊन जेवायला बाहेर जात नाही.
शहरातून फेरफटका मारत असताना गाड्यावर गरमागरम भजी तळत असताना त्याचा वासाने आपण आकर्षित होतो व काही काळ आपली पावले तेथेच थबकतात. तेथेच उभे राहून एक दोन प्लेट भजी खावीत अशी आपली इच्छा होते. मात्र आपली प्रतिष्ठा आड येते. लोक काय म्हणतील हा विचार करून आपण गाड्यावरील भजी खाण्याचे टाळतो. “आलंय ना तुमच्या मनात, चलाSSSSS “ असा विचार आपण करत नाही.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याचा संपर्क मोठा असतो. सुट्टीच्या दिवशी मित्र गेट टूगेदर करतात. या पार्ट्या बहुतेक रात्रीच्या वेळेस असतात. एखादा पेग आपण देखील मारावा सुरमईची चव आपण देखील चाखावी असे मनोमन वाटत असते. मात्र तेवढे स्वातंत्र्य आपणास नसल्याने आपण त्या आनंदापासून दुरावतो. आशा वेळेस “ आलंय ना तुमच्या मनात, चलाSSSSS “ असा विचार करून आपण जाण्याचे धाडस करत नाही.
माणसानं आपलं मन कधीच मारू नये. एखादी गोष्ट मनात आली की ती करावी कारण या जगातून गेल्यावर आपण पुन्हा ती करू शकत नाही. जोवर आयुष्य आहे तोवर सर्व गोष्टींचा उपभोग घ्यावा. जग काय म्हणेल याचा विचार मुळीच करू नये. “आलंय ना मनात चला” असे म्हणून मनसोक्त गावे, नाचावे, खावे, प्यावे. त्यात वयाचा समाजाचा विचार कधीच करू नये.
प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार, मोबाईल क्रमांक 9881157709

Marathi Funny by Pradip gajanan joshi : 111315561

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now