आठवण

नातवंड म्हणजे आज्जी आजोबांसाठी दुधावरची सायच. मला असे सुंदर, निर्मळ मनाचे आज्जी आजोबा लाभले त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. आज्जी आजोबा म्हणजे बालपणीच्या आठवणींचा खजिना. आता माझं वय अठ्ठावीस आहे, पण अजूनही मी जेव्हा आज्जी आजोबांच्या सानिध्यात असतो तेव्हा न जाणे कशी पण मधली वर्षच गायब होतात व मी पुन्हा लहान होतो व रोजच्या धकाधकीच्या जिवनातील ताण-तणाव नाहीसे होऊन माझं मन बालपणीच्या त्या गोड, निरागस आठवणीत हरवतं. माझं मन एका वेगळ्याच भावविश्वात रममाण होतं, जिथे परीकथा सांगून आम्हाला एका वेगळ्या दुनियेत नेणारी तर कधी भुताखेतांच्या गोष्टी सांगून घाबरवणारी आज्जी असते, आम्हाला रोज वेगवेगळी चॉकलेट्स देणारे आमचे अकोले आजोबा असतात, वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांनी खच्चून भरलेली निर्जीव पण जिवंत वाटणारी कपाटे असतात, थंडीच्या दिवसात गारठलेल्या अंगाला ऊब देणारी अंगणात पेटवलेली शेकोटी असते, दर रविवारी सकाळी लवकर उठायला लावून आमची झोपमोड करणारी दत्ताच्या देवळातील बालोपासना असते, बालोपासनेनंतर मिळणारा व सकाळी लवकर उठणं अगदीच व्यर्थ नाही गेलं याची जाणीव करून देणारा गोड शिऱ्याचा प्रसादही असतो, तसेच पूर्ण अंगणभर आपल्या वाळलेल्या पानांचा शिडकाव करून आज्जी आजोबांना थकवणारा थंडगार औदुंबर सुद्धा असतो.

Marathi Story by Niranjan Pranesh Kulkarni : 111285156

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now